वृत्तसंस्था /भोपाळ
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱया हॉकी संघातील मध्यप्रदेशचा सदस्य विवेक सागर प्रसादचा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुरुवारी सत्कार केला.
याप्रसंगी सीएम चौहान यांनी त्याला शाल अर्पण करून 1 कोटी रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला. येथील मिन्टो हॉल येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवेक सागरची पोलीस खात्यात डीएसपीपदी नियुक्ती केल्याचे तसेच त्याला घरकुल देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार राज्यात कोणत्याही ठिकाणी हे घरकुल दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला हॉकी संघाच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले असून संघातील प्रत्येक सदस्याला 31 लाख रुपये देण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. ‘ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चौथे स्थान मिळविले असले तरी आपल्या कामगिरीने त्यांनी तमाम भारतीयांची मने जिंकली आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी त्यांची प्रशंसा केली.
ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच हॉकीमधील पदक जिंकण्याचे महिलांचे स्वप्न थोडक्यात हुकले. अतिशय चुरशीने लढलेल्या कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटनकडून 3-4 अशा निसटत्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र ऑलिम्पिकमधील त्यांची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री चौहान व विवेक सागर यांनी स्मार्ट सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण केले. विवेक सागर हा होशंगाबाद जिल्हय़ातील इटारसी तहसीलमधील शिवनगर चंदन या खेडय़ातील रहिवासी आहे. अर्जेन्टिनाविरुद्ध झालेल्या लढतीत त्याने नोंदवलेल्या गोलमुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले होते. भारताने नंतर उपांत्य फेरी गाठली आणि त्यानंतर कांस्यपदकाची लढत जिंकली होती.