नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय संघातील आघाडीचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार व त्याची पत्नी नुपूर कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्याने मीरत येथील आपल्या घरी क्वारन्टाईन झाले आहेत. या उभयतांना कोरोनाची बाधा झाली आहे का, याबद्दल अद्याप संभ्रमावस्था आहे. यापूर्वी भुवनेश्वरच्या आईला दि. 21 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी सर्व कुटुंबियांनी चाचणी करवून घेतली. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. भुवनेश्वरच्या वडिलांचे अलीकडेच कर्करोगाशी लढत असताना निधन झाले आहे. ते निधनसमयी 63 वर्षांचे होते.
भुवनेश्वर कुमारचा न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिप फायनल व इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नाही. मात्र, जुलैमध्ये लंका दौऱयात मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी तो शिखर धवनसह नेतृत्वाच्या शर्यतीत आहे. भुवनेश्वरने आजवर 21 कसोटी, 117 वनडे व 48 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने डिसेंबर 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असून तिन्ही क्रिकेट प्रकारात एकत्रित 246 बळी घेतले आहेत.