भारताविरुद्ध प्रभावशाली खेळाची पोचपावती, अजाज पटेल, डेव्हॉन कॉन्व्हे यांचाही मुख्य श्रेणीत समावेश
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
भारताविरुद्ध स्वप्नवत कसोटी पदार्पण करणाऱया जलद गोलंदाज काईल जेमिसनला न्यूझीलंड क्रिकेटने 2020-21 हंगामासाठी मध्यवर्ती करार श्रेणीत समाविष्ट केले आहे. याच वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जेमिसनने भारताविरुद्ध प्रभावशाली खेळ साकारला होता.
25 वर्षीय जेमिसन भारताविरुद्ध आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यानंतर हॅग्ले ओव्हल येथे संपन्न झालेल्या दुसऱया कसोटी सामन्यात डावात 5 बळी घेत त्याने पुन्हा एकदा सामनावीर पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. विराट कोहली अँड कंपनीविरुद्ध खेळताना 2 कसोटी सामन्यात त्याने 9 बळी घेतले. शिवाय, फलंदाजीत 46 ची सरासरी देखील नोंदवली होती.
‘काईल जेमिसनने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी दमदार प्रदर्शन साकारणे हे न्यूझीलंड क्रिकेटसाठी आम्ही सुचिन्ह मानतो. नजीकच्या कालावधीत तो निश्चितच संघासाठी सातत्याने आणखी भरीव योगदान देईल’, असा विश्वास निवड समितीचे व्यवस्थापक गेव्हिन लार्सन यांनी पत्रकातून व्यक्त केला.
डावखुरा फिरकी गोलंदाज अजाज पटेल व दक्षिण आफ्रिकेतील जन्म असणारा फलंदाज डेव्हॉन कॉन्व्हे यांनाही पुढील एका वर्षाकरिता प्रथमच करारश्रेणीत समाविष्ट केले गेले आहे. नवे करार अधिकृतरित्या 1 ऑगस्टपासून लागू असतील आणि तो स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी खेळाडूंकडे दि. 22 मे पर्यंत वेळ असणार आहे.
‘मागील 12 महिन्यांच्या कालावधीत काईल, अजाज व डेव्हॉन या तिघांनीही सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारले असून यामुळे त्यांचा प्राधान्याने विचार झाला’, असे लार्सन यांनी याप्रसंगी नमूद केले. यापैकी डेव्हॉन कॉन्व्हे हा 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाला असून यंदा ऑगस्टमध्येच तो न्यूझीलंड संघातून खेळण्यासाठी पात्र होईल. या 28 वर्षीय फलंदाजाने मागील 2 हंगामात प्रथमश्रेणी फलंदाजीच्या आघाडीवर जोरदार वरचष्मा गाजवला आहे. अजाज पटेलनेही प्रथमश्रेणीत उत्तम योगदान दिले असून मागील दीड-एक वर्षाच्या कालावधीत त्याला कसोटी संघातून संधी मिळत राहिली आहे.
‘डेव्हॉनने मागील दोन हंगामात तिन्ही क्रिकेट प्रकारात अतिशय उत्तम योगदान दिले आणि यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते. फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी तो समयोचित, महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल’, असे लार्सन पुढे म्हणाले. डावखुरा फिरकीपटू अजाज पटेलकडे आपण कसोटी स्पेशालिस्ट म्हणून पाहतो. भविष्यात उपखंडात स्वतःला आणखी सिद्ध करण्याची त्याच्याकडे संधी असेल, याचाही त्यांनी उल्लेख केला.
मुन्रोसह तिघे निवृत्तीमुळे बाहेर
कॉलिन मुन्रो, जीत रावळ व फिरकीपटू टॉड ऍसल जानेवारीत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले असल्याने नव्या करारात त्यांचा विचार झाला नाही. जिम्मी नीशम, विल यंग व टॉम ब्लंडेल यांचे करार यंदाही कायम राहिले आहेत.
2020-21 हंगामासाठी मध्यवर्ती कराराची ऑफर देण्यात आलेले खेळाडू : टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्व्हे, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, जेम्स नीशम, अजाज पटेल, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॅटलिंग, केन विल्यम्सन, विल यंग.