क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे 9 जानेवारी रोजी भव्य कुस्ती जंगी मैदानाचे आयोजन आनंदवाडी कुस्ती आखाडय़ात करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनी भांदुरगल्ली व महाराष्ट्र चॅम्पियन पुण्याचा संतोष कडोलकर यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती आयईजी सेंटर बेंगळूरचा आकाश घाडी वि. आंतरराष्ट्रीय चॅम्पियन सौरभ पाटील राशिवडे, तिसऱया क्रमांकाची कुस्ती पवन चिकद्दीनकोप्प भांदुरगल्ली व किर्तीकुमार बेनके कंग्राळी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी व सिद्धारूड धारवाड यांच्यात होईल.
याशिवाय, पाचव्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी कलखांब व संतोष गावडे पुणे, सहाव्या क्रमांकाची कुस्ती राजु गंदीगवाड भांदुरगल्ली, व विक्रम गावडे तुर्केवाडी, सातव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत गंदीगवाड भांदुरगल्ली वि. वासू शिरतोडे राशिवडे, आठव्या क्रमांकाची कुस्ती गुरूलिंग मुधोळ एमईजी सेंटर बेंगळूर व दर्शन लहान कंग्राळी, नवव्या क्रमांकाची कुस्ती लक्ष्मण मुन्नोळी बेंगळूर व मंजू धारवाड भांदुर गल्ली, दहाव्या क्रमांकची कुस्ती श्रीघाडी वि कोईघोडे राशिवडे यांच्यात होणार आहे. त्याशिवाय 50 हून अधिक लहान मोठय़ा कुस्त्या होणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष मारूती घाडी व सचिव वसंत सोनलकर यांनी कळविले आहे.