प्रवाशांचा श्वास कोंडतोय : धुळीकडे परिवहनचे दुर्लक्ष, अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होवून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे परिवहननेदेखील दुर्लक्ष केले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानक उभारले जात आहे. याकरिता आवारात खोदाई करून काही ठिकाणी माती टाकण्यात आली. दरम्यान या मार्गावरून बसची ये-जा सुरू असल्याने धूळ मोठय़ा प्रमाणात उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेणे कठीण होत आहे. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने खडी विखुरली गेली आहे. त्यातच बसफेऱयांची संख्या वाढल्याने आवाराची धुळधाण उडाली आहे. यातूनच प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे.
बसस्थानकात प्रवाशांची वाढ
गजबजणाऱया बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढली आहे. विविध ठिकाणी प्रवासासाठी प्रवासी थांबलेले असतात. मात्र धुळीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना नाकाला रुमाल लावूनच बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे आणि बसफेऱयामुळे धूळ उडत आहे. काही वेळेला धुळीचे ढग निर्माण झाल्याने समोरचे दिसणे अवघड बनले आहे. विखुरलेली खडी आणि मातीमुळे धुळीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिवहनने अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.