अतिरिक्त बससेवेला प्रतिसाद, परिवहनच्या महसुलात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनने दिवाळीकाळात प्रवाशांच्या सोयीखातर अतिरिक्त बससेवा पुरविली आहे. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम मिळत असून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळीची सुटी संपवून परतलेल्या नागरिकांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने मध्यवर्ती बसस्थानकात गर्दी होत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान दिवाळीसाठी परिवहनने विविध मार्गांवर जादा बस पुरविल्या आहेत. या जादा बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने मंदिरे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबरोबरच विविध मार्गांवर बससेवादेखील पूर्ण क्षमतेने धावत असल्याने परिवहनच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
विविध मार्गांवर बससेवाही पूर्ववत
परिवहनने दिवाळीसाठी मुंबई, नाशिक, पुणे, बेंगळूर, मंगळूर, चेन्नई, हैदराबाद, बळ्ळारी, धारवाड, हुबळी, बागलकोट यासह इतर ठिकाणी बसफेऱया वाढविल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. गतवषी कोरोनामुळे दिवाळीचा हंगाम वाया गेला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने परगावी जाणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. तसेच विविध मार्गांवर बससेवाही पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळीत काही बसगाडय़ा भरून धावत आहेत. त्यामुळे साहजिकच परिवहनच्या महसुलात वाढ झाली आहे. मात्र अद्याप कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ठप्प असल्याने परिवहनला निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून दूर रहावे लागले आहे.
आसनांअभावी प्रवाशांची गैरसोय : बसस्थानकात सुविधांपेक्षा असुविधाच अधिक
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकात प्रवाशांना सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना अधिक करावा लागत आहे. राज्यांतर्गत बससेवा सुसाट धावत असल्याने परिवहनचा महसूलदेखील पूर्वपदावर येत आहे. मात्र बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकात बसथांब्यांअभावी प्रवाशांना भर उन्हात थांबावे लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट सिटीअंतर्गत सुसज्ज असे स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहे. प्रवासी वाहतुकीसाठी तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने बसच्या प्रतीक्षेत बाहेर उन्हातच ताटकळत थांबावे लागत आहे. बसस्थानकात ठेवण्यात आलेल्या आसनांची दुरवस्था झाली आहे. तर प्रवाशांची संख्या वाढल्याने आसने कमी पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. परिणामी बस वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.
अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा बसस्थानकातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामनाही करावा लागत आहे. या तात्पुरत्या बसस्थानकात स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या बसेस एकच ठिकाणी थांबविल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचीदेखील गर्दी वाढत आहे. मात्र त्या तुलनेत प्रवाशांना बसण्यासाठी आसने उपलब्ध नसल्याने बाहेर उन्हात थांबावे लागत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन परिवहनने तातडीने आसनांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.