वाईन शॉपमध्ये घुसून रोकड लांबविली, गुन्हेगाराकडून दगडफेकही झाल्याने काही काळ तणावाची स्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
येथील मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांना लुटणाऱया एका टोळीच्या कारवाया वाढल्या आहेत. बसच्या प्रतीक्षेत असणाऱया प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील पैसे काढून घेणे, अंगावरील दागिने काढून घेण्याचे प्रकार वाढीस लागले असून याच टोळीतील एका गुन्हेगाराने गुरुवारी रात्री एका वाईन शॉपवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या एका वाईन शॉपमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड पळविण्यात आली आहे. रोकड पळविताना या तरुणाने वाईन शॉपवर दगडफेकही केली आहे. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून या प्रकरणाची माहिती घेतली होती. उपलब्ध माहितीवरुन कबाडी वाईन्सवर दगडफेकीची घटना घडली आहे. याच वाईन शॉपमधील 7 हजार 500 रुपये रोकड पळविणाऱया बबलु नामक युवकावर गुरुवारी रात्री उशीरा येथील मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून लुटमारीच्या घटनेनंतर तो फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कसई खड्डा परिसरातील काही तरुण मध्यवर्ती बसस्थानक व जुन्या पी. बी. रोड परिसरात धुडगूस घालत आहेत. प्रवासी व नागरिकांना अडवून त्यांच्याजवळील पैसे, मोबाईल, अंगावरील दागिने लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक प्रवाशांनी या संबंधी मार्केट पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. खास करुन रात्रीच्यावेळी बसच्या प्रतीक्षेत मध्यवर्ती बस स्थानकात थांबलेल्या प्रवाशांना गाठून त्यांना मारहाण करण्यात येते. चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील रोकड लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.
गुन्हेगारांना अटक करा
मध्यवर्ती बस स्थानक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या परिसरात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी धुडगूस सुरू केला आहे. बस स्थानकावर पोलिसांची गस्त असली तरी त्यांना चकवून प्रवाशांना लुटण्यात हे गुन्हेगार तरबेज आहेत. अनेक प्रवासी या गुन्हेगारांना घाबरुन आपल्या जवळील ऐवज त्यांना देवून आपला बचाव करुन घेतात. या टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे.