बेळगाव/ प्रतिनिधी
शहराच्या मध्यवस्तीतील लॉजमध्ये कोरोनाच्या संशयितांची व्यवस्था करण्याच्या प्रशासनाच्या कृतीविरोधात नागरिक एकवटले आहेत. संशयितांना शहराच्या मध्यवर्ती असणाऱया लॉज किंवा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवू नये अशी जोरदार मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.
शहरातील चव्हाट गल्ली, खडेबाजार, शेट्टी गल्ली परिसरात नागरिक एकत्र आले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना होत असताना दुसरीकडे अशाप्रकारे भरवस्तीत या रुग्णांना ठेवणे चुकीचे असल्याचे मत मांडून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱयांच्या नावे एक निवेदनही सादर केले असून यामध्ये अशा प्रकारच्या संशयितांना या ठिकाणी वास्तव्यास ठेवू नये अशी मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल्स आणि लॉजमध्ये या रुग्णांची व्यवस्था झाल्यास नागरिकांना याचा फटका सोसावा लागेल, अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱयांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणीही केली आहे.