शिक्षण खात्याचा आदेश : दरवाढीमुळे ठेकेदारांकडून अन्य तेलाचा वापर
प्रतिनिधी/ बेळगाव
रशिया आणि युपेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका विविध देशांना बसला आहे. कर्नाटकात असाच परिणाम शाळांमधील मध्यान्ह आहारावर होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. सूर्यफूल तेलाच्या किंमती वाढल्याचा हा परिणाम असला तरी कोणत्याही स्थितीत इतर प्रकारचे खाद्यतेल वापरू नये, असा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे.
मध्यान्ह आहारात विशेषतः सूर्यफूल तेलाचाच वापर केला जातो. पण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात साठेबाजी वाढली आहे. परिणामी खाद्यतेलांच्या किमतीही वाढत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये इतर खाद्यतेलाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मध्यान्ह आहारासाठी खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱया ठेकेदारांकडून किंमतवाढीच्या कारणावरून ही हेराफेरी केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर शिक्षण खात्याने अध्यादेश जारी केला आहे.
शिक्षण आयुक्त डॉ. आर. विशाल यांनी कोणत्याही स्थितीत सूर्यफूल तेलाऐवजी अन्य खाद्यतेल वापरता येणार नाही. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करून सूर्यफूल तेलच खरेदी करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. सध्या प्राथमिक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 42 पैसे तर पूर्ण प्राथमिक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 67 पैसे प्रतिदिन खाद्यतेलासाठी दिले जातात. त्यात वाढ करण्याचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.