मृतांमध्ये 16 पुरुष, तीन महिलांचा समावेश
मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था
मध्य मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मध्य मेक्सिकोमध्ये एका उत्सवादरम्यान स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत 19 जणांना गोळय़ा घालून ठार करण्यात आल्याचे राज्य ऍटर्नी जनरल कार्यालयाने सोमवारी एका निवेदनात स्पष्ट केले. मृतांमध्ये 16 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. गोळीबाराचे कारण तातडीने स्पष्ट झाले नसले तरी सुरक्षा यंत्रणांकडून हल्ल्याचा तपास आणि हल्लेखोराचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मिचोआकन राज्यातील लास टिनाजास शहरात एका उत्सवी मेळाव्यावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. गोळीबाराची माहिती मिळताच क्राईम सीन आणि एक्सपर्ट सर्व्हिसेस युनिटचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांना रुग्णालयात नेण्यात आले. गोळीबाराच्या या घटनेनंतर गर्दीच्या ठिकाणी धावपळ आणि चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.