1 जुलैपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका लोकनियुक्त सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपली आहे. मात्र विविध कारणास्तव निवडणूक रखडली आहे. निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली चालविल्या आहेत. याकरिता सोमवारी महापालिकेच्यावतीने तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याबाबत सूचना आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका सभागृहाची मुदत अंतिम टप्प्यात असताना वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली होती. मात्र वॉर्ड पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना वादाच्या भोवऱयात सापडली होती. बेंगळूर उच्च न्यायालयातील निकालानुसार राज्य शासनाने बेळगाव महापालिकेसह विविध महापालिका, नगरपालिकांचे आरक्षण जाहीर केले होते. तसेच राज्य निवडणूक आयोगाने देखील मतदारयादी तयार करण्याची सूचना महापालिकांना केली होती. दि. 1 जानेवारी 2021 रोजी पात्र असणाऱया मतदारांची नोंद घेऊन मतदारयादी तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने मतदारयादी तयार केली असून हरकत नोंद करून घेण्यासाठी प्रसिद्ध केली आहे. महापालिका मुख्य कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका कचेरी आदी ठिकाणी तात्कालिक मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. दि. 1 जुलैपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सात दिवसांचा अवधी आवश्यक
तात्कालिक मतदारयादी सोमवार दि. 28 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून हरकती नोंदविण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी दिला आहे. पण सोमवारी प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे एक दिवस वाया गेला असून मतदारयादी घेऊन त्याबाबत सविस्तर पाहणी करून तक्रार नोंदविण्याकरिता नागरिकांकडे केवळ तीन दिवसांचा अवधी आहे. वास्तविक पाहता हरकती नोंदविण्याकरिता देण्यात आलेला अवधी खूप कमी असून किमान सात दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे. पण महापालिकेने दिलेला वेळ अत्यल्प असल्याने तक्रारी नोंदविण्याकरिता नागरिकांना धावपळ करावी लागणार आहे.