भाग्यनगर येथील घटनेने खळबळ : मोजमाप करण्याच्या बहाण्याने तिजोरीवर डल्ला
प्रतिनिधी / बेळगाव
आपण महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आहोत. घराचे मोजमाप करण्यासाठी येथे आलो आहोत, असे सांगत दोघा भामटय़ांनी 3 लाखांचे दागिने लांबविल्याची घटना भाग्यनगर येथे घडली आहे. या प्रकरणी रविवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
उमेश बसलिंगाप्पा रामगुरवाडी, रा. भाग्यनगर, पहिला क्रॉस हे राहत असलेल्या भाडोत्री घरात 2 मार्च रोजी ही घटना घडली असून तब्बल तेरा दिवसांनंतर या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. भामटय़ांनी 2 लाख 94 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅमचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या मंगळवारी 2 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता उमेश यांची आई गिरिजा या एकटय़ाच आपल्या घरी बसल्या होत्या. त्यावेळी 30 ते 35 वयोगटातील दोन भामटे त्यांच्या घरी आले. ‘आम्ही महापालिकेतून आलो आहोत. बाहेर मोजमाप करायचे आहे’, असे सांगून गिरिजा यांना घराबाहेर बोलाविले.
एका भामटय़ाने मोजमापाची टेप काढून मोजमाप करण्यास सुरुवात केली. त्याचे एक टोक गिरिजा यांच्या हातात देऊन त्यांना घराबाहेर उभे केले. तोपर्यंत दुसरा भामटा बेडरुममध्ये शिरला. तिजोरीतील 70 ग्रॅमचे दागिने काढून घेतले. टेपचे टोक हातात धरून घराबाहेर थांबलेल्या गिरिजा यांना हा प्रकार लक्षात आला नाही.
‘मोजमाप’ पूर्ण करून भामटे तेथून निघून गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भामटय़ांनी 13 ग्रॅमचे मंगळसूत्र, 15 ग्रॅमची तीन जोड कर्णफुले, 16 ग्रॅमची दोन जोड कर्णफुले, 20 ग्रॅमची कर्णफुले, 3 ग्रॅमची कर्णफुले, 2 ग्रॅमची कर्णफुले, डायमंड असलेली एक ग्रॅमची एक रिंग चोरटय़ांनी पळविली आहे. या प्रकरणी भा.दं.वि. 420, 320 कलमांन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
लक्ष विचलित करून करतात लूट
लक्ष विचलित करून दागिने लुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. अशा प्रकारांमागे खास करून इराणी टोळीतील गुन्हेगार सक्रिय असतात. उमेश रामगुरवाडी यांच्या आईला गाठून घराबाहेर मोजमाप करायचे आहे, असे सांगून 3 लाखांचे दागिने लुटणारे भामटे कोठले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अशा टोळीतील भामटे खासकरून एकाकी महिलांना लक्ष्य बनवतात. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.