प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून याचा लाभ सर्व कामगारांनी घ्यावा. तसेच आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून शहरातील स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी केले. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आरोग्य अधिकाऱयांना संपर्क साधा, अशी सूचना केली.
पौरकार्मिक दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कोनवाळ गल्ली बीट कार्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्तांनी कामगारांना मार्गदर्शन केले. स्वच्छता कामगारांना मास्क, गमबूट, हातमोजे अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. कोरोना कालावधीत स्वच्छता कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन आयुक्तांनी केले. कामगारांनी आपले काम व्यवस्थित करावे, अशी सूचनाही केली.
यावेळी महापालिका आयुक्त रूदेश घाळी, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वच्छता कामगारांसाठी राबविण्यात येणाऱया योजनांची माहिती पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी दिली. तसेच उपस्थितांचे आभार मानले. शहरातील विविध विभागात पौरकार्मिक दिनाचे आचरण करण्यात आले.