@ प्रतिनिधी/ बेळगाव
चव्हाट गल्ली शाळेच्या जागेच्या विक्री प्रकरणामुळे महापालिकेच्या खुल्या जागा असुरक्षित असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या वापरात असलेल्या जागेची स्थिती अशी असताना अन्य जागांचे काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य जागांची स्थिती काय? अशी विचारणा केली असता सर्व जागांचे सर्वेक्षण करून तारेचे कुंपण घालण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. तसेच हे काम करण्याकरिता कंत्राट पद्धतीने सर्व्हेअर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.
चव्हाट गल्ली शाळा क्रमांक पाच जागेची विक्री झाल्याने याबाबत माहिती घेण्यासाठी महापालिका कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱयांची बैठक आमदार अनिल बेनके यांनी बोलावली होती. अन्य जागांच्या सुरक्षेबाबत कोणती दक्षता घेतली आहे, असा मुद्दा आमदार अनिल बेनके यांनी या बैठकीवेळी महापालिका आयुक्तांना विचारला. त्यावेळी सर्व सार्वजनिक खुल्या जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी आपल्या कार्यालयात सर्वेअर नसल्याचे सांगितले. त्यामुळे कंत्राट पद्धतीने सर्व्हेअरची नियुक्ती करण्यात आली असून सर्व खुल्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तसेच जागांना तारेचे कुंपण घालण्यासाठी 40 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्वेक्षण दरम्यान झालेली अतिक्रमणे हटवून जागेला कुंपण घालण्यात येईल. त्याचप्रमाणे जागांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक कारवाई केली जाईल, असे काहीतरी सांगितले. महापालिकेच्या खुल्या जागांची माहिती घेण्याची सूचना महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकाऱयांना केली आहे. या माहितीच्या आधारे सर्व जागांना कुंपण घातले जाईल, असे आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती बाबत चव्हाट गल्ली शाळेच्या आवारात फलक लावण्याची सूचना आमदारांनी केली. सदर फलक तयार करून तातडीने लावावेत, असा आदेश महापालिका आयुक्तांनी मनपाच्या महसूल उपायुक्तांना बजावला. महापालिकेच्या खुल्या जागा बळकावण्याचा प्रकार नवीन नाही. पण अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आता तरी शहाणे होणार का, अशी विचारणा होत आहे.