2019-20 आर्थिक वर्षातील निधीमधून 32 लाभार्थ्यांना मिळाला लाभ : मनपाकडून धनादेश ऐवजी आता लॅपटॉप
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या राखीव अनुदानांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. योजनेंतर्गत लॅपटॉप खरेदीकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. मात्र निधीचा दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने लॅपटॉप खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. 2019-20 आर्थिक वर्षातील निधीमधून 32 लॅपटॉपचे वितरण महापालिकेच्यावतीने करण्यात आले.
महापालिकेला मिळणाऱया अनुदानामधून गरजूंकरिता वैयक्तिक योजना राबविण्याकरिता निधी राखीव ठेवण्यात येतो. मागासवर्गियांसाठी 25.30 टक्के, अल्पसंख्याकांकरिता 7.28 टक्के आणि अपंगांसाठी 5 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. राज्य किंवा केंद्र शासनाकडून मिळणाऱया अनुदानासह महापालिकेच्या उत्पन्नातील निधी राखीव ठेवून गरजूंकरिता योजना राबविण्यात येतात. स्वयंरोजगार, गॅस संपर्क योजना, ड्रेनेज वाहिनी व नळ जेडणी तसेच शैक्षणिक योजनेंतर्गत गरजूंना लॅपटॉप आणि प्रशिक्षण देण्याकरिता राखीव निधी खर्च करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे राज्य शासनाकडून अद्याप कोणतेच अनुदान मंजूर झाले नाही. मात्र, महापालिकेकडे राखीव असलेल्या अनुदानामधून स्वयंरोजगार व लॅपटॉपचे वितरण करण्यात आले आहे. मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या अनुदानामधून 22 लॅपटॉप आणि अल्पसंख्याकांकरिता राखीव असलेल्या अनुदानामधून 10 लॅपटॉप वितरित करण्यात आले.
खऱया लाभार्थींना लॅपटॉप मिळावा याकरिता माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी प्रयत्न चालविले होते. गरजूंना लॅपटॉप मिळावेत याकरिता महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे महापालिकेच्यावतीने लाभार्थींची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांची चाचपणी करून निवड केली होती.
यापूर्वी लॅपटॉप खरेदी करण्याकरिता लाभार्थींना 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात येत होता. पण धनादेश दिल्यानंतर या रकमेमधून विद्यार्थी लॅपटॉप खरेदी करतात का? असा मुद्दा उपस्थित झाला होता. अनुदानाचा विनियोग नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, असा मुद्दा तत्कालीन मनपा प्रशासक अंमलान बिस्वास यांनी उपस्थित केला होता. लाभार्थींना 50 हजार रुपये देण्याऐवजी लॅपटॉप खरेदी करून देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे महापालिकेने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरसह लॅपटॉप पुरविण्याकरिता कंत्राटदार नियुक्त केला होता. त्यामुळे कंत्राटदाराकडून लॅपटॉपची खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.