सरदार्स मैदानातील गॅलरी, जाधवनगर ग्लास हाऊसचे उद्घाटन
@ प्रतिनिधी/ बेळगाव
शंभर कोटी अनुदानामधून प्रलंबित राहिलेल्या कामांबाबत मनपा प्रशासनाला नोटीस बजावण्यात आल्याने कामे पूर्ण करून उद्घाटन करण्याचा सपाटा सुरू आहे. जाधवनगर येथील ग्लास हाऊस आणि सरदार्स मैदानात उभारण्यात आलेल्या गॅलरीचे लोकार्पण सोमवारी झाले. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री विकास अनुदानामधून मंजूर झालेल्या शंभर कोटी निधीमधून शहरात विविध विकासकामे राबविण्यात आली होती. पण क्षुल्लक कारणास्तव विकासकामे शिल्लक होती. त्यामुळे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. अर्धवट कामातील अडथळय़ांबाबत वरि÷ अभियंत्यांनी माहिती देऊनही कामे झाली नव्हती. मात्र, याबाबत महापालिकेला नगरविकास खात्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने मनपाचे अभियंते खडबडून जागे झाले आहेत. अडचणांची माहिती घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करून उद्घाटन करण्याचा सपाटा सुरू आहे. शंभर कोटी अनुदानामधून उभारण्यात आलेल्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
जाधवनगर येथे उद्यानाचा विकास, दिवे आणि ग्लास हाऊसच्या उभारणीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर झाला होता. ग्लास हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सरदार्स हायस्कूल मैदानात गॅलरी व गाळे उभारण्यात आले आहेत. मैदानाभोवती दिवे बसविण्यात आले आहेत. या गॅलरीचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही. एस. हिरेमठ, बी. बी. चौगुला व इतर अधिकारी, नागरिक उपस्थित होते..