प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखाना भाडेतत्वावर देण्यासाठी सोमवारी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र कत्तलखाना आणि बकरी ठेवण्याच्या शेडचे भाडे जास्त असल्याचे सांगुन लिलाव प्रक्रियेकडे व्यवसायिकांनी पाठ फिरविली. त्यामुळे लिलाव प्रक्रिया रद्द झाली.
महापालिकेने कसाईगल्ली येथे बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखान्याची उभारणी केली होती. सदर इमारतीचा वापर मागील काही वर्षापासून मटनमार्केटमधील व्यवसायिक करीत होते. पण या मोबदल्यात महापालिकेला कोणतेच भाडे मिळत नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी बकरी ठेवण्याचे शेड व कत्तलखाना भाडेतत्वावर देण्याकरीता सोमवारी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. पण कत्तलखान्यासाठी प्रति महिन्या 35 हजार रूपये भाडे आणि 5 लाख रूपये अनामत रक्कम तसेच बकरी ठेवण्याच्या शेडकरीता प्रति महिना 25 हजार रूपये भाडे आणि 5 लाख 50 हजार रूपये अनामत रक्कम महापालिकेने निश्चित केले आहे. तसेच कोनवाळगल्ली येथील मटन मार्केटमधील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र अनामत रक्कम आणि भाडे जास्त असल्याची तक्रार मटन मार्केटमधील व्यापाऱयांनी केली होती. कत्तलखाना आणि बकरी ठेवण्याच्या शेडचा वापर मटन मार्केटमधील सर्व व्यापारी करीत असतात. त्यामुळे ही अनामत रक्कम व भाडे कोण भरणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. परिणामी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रसंगी कोणीच भाग घेतला नाही. सदर भाडे व अनामत रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. पण नियमानुसार भाडे व अनामत रक्कम कमी करता येत नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. भाडय़ाची रक्कम जास्त होत असल्याचे कारण पुढे करून लिलाव प्रक्रियेत एकाही व्यवसायिकाने भाग घेतला नाही. व्यवसायिकांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याने ही प्रक्रिया बारगळली.