प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मनपाच्या व्यापारी संकुलातील व्यापारी गाळय़ांना लिलावावेळी चांगला प्रतिसाद लाभला. महापालिकेने मिनी मार्केटमधील एका गाळय़ासाठी 1200 रुपये भाडे निश्चित केले होते. मात्र लिलाव प्रक्रियेत नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतल्याने 3400 रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. मुख्य कॉम्प्लेक्समधील गाळय़ांना 7,100 ते 5,400 पर्यंत बोली लावण्यात आली. त्यामुळे मनपाला चांगला महसूल मिळणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर दोन संकुले असून, समोरील भागातील मुख्य संकुलातील 4 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी मंगळवारी लिलाव आयोजित करण्यात आला होता. यापैकी एक गाळा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित 3 गाळय़ांचा लिलाव करण्यात आला. मनपाने किमान 5 हजार रुपये भाडे एका गाळय़ासाठी निश्चित केले होते. लिलाव प्रक्रियेत 18 नागरिकांनी सहभाग घेतला होता. या गाळय़ांना 7 हजार 100 रुपये सर्वाधिक बोली लागली आहे. मिनी कॉम्प्लेक्समधील 5 गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. एका गाळय़ाचे किमान भाडे 1200 रुपये निश्चित केले होते. एक गाळा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवून 4 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले. सर्वाधिक 3400 रुपये बोली लावण्यात आली. किमान 1600 रुपये बोली लावण्यात आल्याने चारही दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लिलाव प्रक्रियेवेळी महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, साहाय्यक महसूल अधिकारी रवि मास्तीहोळीमठ, महसूल निरीक्षक नंदु बांदिवडेकर आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.