मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन : मनपाच्या नवीन वाहन व मशीनरींचे अनावरण
प्रतिनिधी / पणजी
पणजी आज आम्हाला स्वच्छ दिसत आहे आणि स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत आहे याचे संपूर्ण श्रेय मनपाच्या कर्मचाऱयांना व प्रामुख्याने कचरा उचलणाऱया कामगारांना जाते. त्यांचे हे काम उल्लेखनीय आहे. तसेच सुमारे 75 रिक्त असलेल्या स्वीपरर्सच्या पदांना मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देऊन त्यांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
शुक्रवारी पणजी महानगरपालिकेच्या नवीन कचरा वाहतुकीच्या व मशिनरीच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिगीस, उपमहापौर वसंत आगशीकर, इतर नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीफळ वाढवून या नवीन वाहनांचे व मशिनरींचे अनावरण केले.
मनपातर्फे महापौर उदय मडकईकर व आयुक्त संजित रॉड्रिगीस यांनी सुमारे स्वीपरची 75 रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी केली होती. जे स्वीपर अनेक वर्षे कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱया ज्येष्ठतांच्या आधारावर 75 जणांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करण्यात येणार आहे. तसेच यात खास तरतुद करण्यात आली की यातील जो व्यक्ती निवृत्त होणार त्याच्यानंतर पुन्हा ज्येष्ठतांच्या आधारावर भरती करण्यात येणार आहे. याचा पूर्ण अधिकार महापौर व मनपा आयुक्त यांना देण्यात आला आहे, जेणेकरुन त्यांना पुन्हा पुन्हा सरकारकडे यावे लागणार नाही, असे डॉ. सावंत यांनी अधिक बोलताना सांगितले.
14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत सुमारे 10 कोटी रुपये खर्च करुन या नवीन कचरा उचलणाच्या गाडय़ा व इतर मशिनरी घेण्यात आली आहे. आता 15 वे वित्त आयोग सुरु आहे, परंतु आयुक्तांनी 14 व्या वित्त आयोगाचा योग्य उपयोग या कामासाठी केला आहे. या नवीन गाडय़ा व मशिनरीमुळे अनेक कामे सहज होणार आहेत. अशाप्रकारचे काम इतर पालिकेमध्ये देखील होणे गरजेचे आहे, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
कचऱयाची समस्या मिटणार : महापौर मडकईकर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांचा आम्हाला नेहमीच पाठिंबा मिळाला आहे. आधुनिक सुविधा असणाऱया नवीन गाडय़ा व मशिनरी मनपातर्फे पणजीसाठी आणल्या आहेत. त्यामुळे सुखा कचरा व ओला कचरा यांची समस्या मोठय़ा प्रमाणात सुटणार आहे. या आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने लोकांच्या विश्वासावर सार्थ ठरण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे महापौर उदय मडकईकर यांनी यावेळी सांगितले.
मनपातर्फे हल्ली अनेक उपक्रम व सुविधा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुरविण्यात येत आहेत. नवीन बायोडायेजस्टर शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आले आहेत, तसेच 16 प्रकारे कचऱयाचे विघटन करणारे पणजी हे पहिले शहर बनले आहे, असेही मडकईकर यांनी पुढे सांगितले.