महापौर उदय मडकईकर यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
मनपातर्फे राजधानीत विविध ठिकाणी सेंद्रीय कचऱयाच्या प्रक्रियेसाठी 18 बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प केंद्राच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने सुरू केलेल्या इनोव्हेशन क्लीन टेक्नोलॉजी कार्यक्रमाचा एक भाग आहे.
बायोमिथेनेशन युनिट गोवा राखीव पोलिस मुख्यालय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा कॅम्पस, आल्तिनो कदंबा बस टर्मिनस आणि कांपाल परेड मैदान, मळा तलाव कम्पोस्टिंग शेड, वाहतूक भवन, नगरपालिका गॅरेज, सिने नॅशनल थिएटर, रोझ गार्डन, जॅक सिक्वेरा रस्ता, पणजी एनिमल वेल्फेअर सोसायटी भाग सांतइनेज, आदीठिकाणी उभारण्यात येणार आहेत. फ्लायकॅचर्स टेक्नोलॉजी एलएलपीशी करार करून मनपा हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी वित्त आयोगामार्फत निधी देण्यात येणार आहे. युनिटसाठी ना हरकत दाखला वाहतूक संचालनालय, कदंबा वाहतूक महामंडळ, मनपा आणि तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात मंत्रिमंडळाने आर्थिक नियमांमध्ये शिथिलता आणून मनपाला गुजरात आधारित फ्लायकॅचर्स टेक्नोलॉजी एलएलपीबरोबर 2.9 कोटी रूपये खर्च करून बायो डायजेस्टर युनिटचे ऑपरेशनसाठी परवानगी दिली. सदर प्रकल्पात 75 ते 1000 किला सेंद्रीय कचऱयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सदर प्रकल्प स्थापित झाल्यानंतर शहरातील कचरा कमी करण्यात मदत होईल आणि कामगारांना याचा लाभही होईल.
मळा येथे 150 आणि 75 किलो या क्षमतेचे दोन डायजेस्टर, सिने नॅशनल थिएटर भागात 500 किलो क्षमतेचा, गोवा राखीव पोलिस मुख्यालय आल्तिनो पणजी येथे 150 किलो क्षमतेचा, नगरपालिका गॅरेज 300 किलो, पोलिस मुख्यालय 150 किलो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॅम्पस 150 किलो, प्रस्तावित वाहतूक भवन 1000 किलो, कदंबा बसस्थानक 300, 150, 75 किलोच्या क्षमतेचा, रोझ गार्डन 75 किलो, जॅक सिक्वेरा रस्ता करंजाळे 500 किलो, पणजी एनिमल वेल्फेअर सोसायटी भाग सांतइनेज 300 किलो, परेड मैदान 150 किलो क्षमतेचे डायजेस्टर उभारण्यात येणार आहेत अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.