मनपा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेतील कर्मचारी कोरोना काळातही रात्रंदिवस काम करत आहेत. महानगरपालिकेतील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱयांचा जनतेशी थेट संपर्क येतो. त्यामुळे कोरोनाची लागण होत आहे. तेंव्हा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱयांवर उपचार करण्यासाठी बिम्स् ऐवजी स्वतंत्र हॉस्पिटलची सोय करावी, अशी मागणी महानगरपालिका नोकर संघातर्फे करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेतील अधिकारी व इतर कर्मचारी याचबरोबर स्वच्छता कर्मचारी कोरोना काळातही काम करत आहेत. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा स्वच्छता कर्मचारी करत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तेंव्हा कर्मचाऱयांची वरचेवर आरोग्य तपासणी करावी. त्याचबरोबर कोरोनाची बाधा झाल्यास स्वतंत्र हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन देमट्टी, गजानन कांबळे, गणपत भट्ट, सुरेश कल्याणशेट्टी, बाळकृष्ण पिसाळे, रवी पुरेकर, भरत तळवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.