.वाहतूकीस अडथळा, विनापरवाना जाहिरात केल्याप्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसापासून फुटपाथवरील आणि प्रमुख रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी बाउन्स कंपनीची भाडेतत्वावर देण्यात येणारी दुचाकी वाहने रस्त्यावर,फूटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याने सदर वाहने जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी केली.
शहरवासीयांच्या सुविधेसाठी भाडेतत्वावर वाहने देण्याची योजना बाउन्स कंपनीने राबविली आहे. ऑनलाइन द्वारा भाडे भरून कोणत्याही स्थळी उपलब्ध होणारी वाहने सध्या शहरातील विविध कोणा कोपऱयात उपलब्ध आहेत. बाउन्स या कंपनीने 310 वाहने बाजारपेठेत असल्याची माहिती महापालिकेला दिली आहे. पण सदर वाहने साडेतीनशेहून अधिक असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱयांनी केला आहे. शहरात विविध ठिकाणी सदर वाहने उभारण्यासाठी महापालिकेकडून कोणतीच परवानगी घेतली नाही. तसेच रस्त्याशेजारी, फूटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी ही वाहने उभारण्यात येत आहेत. वाहनांवर कंपनीचे नाव लिहून जाहिरात देखील करण्यात येत आहे. पण याकरिता कंपनीने महापालिकेकडून जाहिरात परवानगी घेतली नसल्याचे मनपा अधिकाऱयांचे म्हणणे म्हणणं आहे. शहरातील विविध रस्त्यावर, फूटपाथ आणि नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक रहदरी अडचण निर्माण होत आहे. याठिकाणी वाहने उभारण्यात येऊ नयेत अशी सूचना करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने जप्त करण्याची कारवाई मंगळवारी विविध ठिकाणी राबविली. विनापरवाना जाहिरात आणि विनापरवाना रस्त्यावर वाहने पार्क करण्यात आल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.