लाल-पिवळय़ा झेंडय़ाविरोधात आंदोलन : भगवा फडकविण्यासाठी महिला आघाडी सरसावली : महिलादिनी महिलांचा अवमान करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या लाल-पिवळय़ा झेंडय़ाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका कार्यालयासमोर भगवा झेंडा फडकविण्यासाठी महिला दिनादिवशी म.ए. समितीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सरसावल्या. मात्र, सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांनी माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व महिला कार्यकर्त्यांकडील भगवा ध्वज हिसकावून घेऊन महिलांना अटक केली.
महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल-पिवळा ध्वज फडकाविण्यात आला आहे. ध्वज हटविण्याऐवजी महापालिका कार्यालयासमोरील ध्वजाला पोलीस प्रशासनाने संरक्षण दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याबाबत घडामोडी सुरू असून झेंडा हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक वेळा वेळ घेतला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे म. ए. समितीच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा संपल्यानंतर महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर भगवा फडविण्याचा प्रयत्न केला. मुख्य मार्गाशेजारी रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. महापालिका कार्यालयाच्या सभोवती जाणारे संपूर्ण रस्ते बंद करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशा परिस्थितीमध्येही माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज आणि ध्वजस्तंभासह मनपा कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. एसपी ऑफीसजवळ येताच पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यामुळे तैनात केलेल्या पोलिसांनी धाव घेऊन महिलांकडील भगवा ध्वज आणि स्तंभ हिसकावून घेतला. त्यानंतर सर्व महिलांच्या सभोवती बॅरिकेड्स लावून अटक केली. यावेळी माजी महापौर व माजी उपमहापौरांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मात्र, ही कारवाई पुरुष पोलिसांनी करून महिला दिनी महिलांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांना बोलावून माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, कार्यकर्त्या रूपा नावगेकर, रेणु भोसले, दीपा मुतगेकर, रेणु मोरे आदींना अटक करून माळमारुती पोलीस स्थानकात नेण्यात आले. यामुळे पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
अटक झाल्यानंतर म. ए. समितीच्या नेत्यांसह माजी नगरसेवक नेताजी जाधव, मदन बामणे, आर. आर. पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मेघन लंगरकांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके आदींनी माळमारुती पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. त्या ठिकाणी लेखी हमीपत्र देऊन सर्वांची सुटका करण्यात आली. महिला आघाडीने दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.