अनधिकृत व्यावसायिकांवर येत्या चार दिवसांत कारवाई होण्याची शक्यता : आर्थिक वर्षात केवळ 130 परवान्यांचे नुतनीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. यापैकी केवळ 9 हजार 624 व्यावसायिकांनी मनपाकडे व्यवसाय परवान्याची नोंदणी केली आहे. काही ठराविक व्यावसायिकांनीच आतापर्यंत व्यवसाय परवान्याचे नुतनीकरण केले आहे. बहुतांश नागरिकांनी परवाना नुतनीकरण केला नसल्याने महापालिकेच्यावतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यवसाय परवाना घेणे सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने व्यवसाय परवान्याची सेवा ऑनलाईन केली आहे. पण काही मोजकेच व्यावसायिक ऑनलाईनद्वारे अर्ज करून व्यवसाय परवाने घेतात. बहुतांश व्यावसायिक परवान्यासाठी महापालिका कार्यालयात येऊन अर्ज करतात. पण व्यवसाय परवाना घेणाऱयांची संख्या खूप कमी असून 2021-22 या आर्थिक वर्षात आतापर्यंत केवळ 130 व्यावसायिकांनी परवाना नुतनीकरण करून घेतला आहे. 25 व्यावसायिकांनी नवीन व्यवसाय परवान्याची नोंदणी महापालिकेकडे केली आहे. उर्वरित व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.
मागीलवषी 562 व्यावसायिकांनी नव्याने व्यवसाय परवाना घेतला होता. या व्यावसायिकांनीदेखील परवाना नुतनीकरण करून घेण्याकडे पाठ फिरविली आहे. व्यवसाय परवाना घेण्याकडे व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेला महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. व्यवसाय परवाना घेण्यासाठी व्यावसायिकांना महापालिकेला शुल्क भरावे लागते. हे शुल्क वाचविण्यासाठी व्यावसायिकांनी परवाना नुतनीकरण करून घेतला नसल्याचे आढळून आले आहे.
व्यवसाय परवाना नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिकेकडून सातत्याने केले जाते. पण व्यावसायिक याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांनी व्यवसाय परवाना तपासणी मोहीम हाती घेतली होती. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांदरम्यान शहरातील व्यावसायिकांकडे जावून पाहणी केली होती. व्यवसाय परवान्याची विचारणा करून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली होती.
व्यवसाय परवाना घेण्याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष
कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे व्यवसाय परवाना घेण्याकडे पाठ फिरविली होती. अनलॉक होऊन महिना उलटला तरी व्यवसाय परवाना घेण्याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अनधिकृत व्यावसायिकांची यादी तयार करून कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम येत्या चार दिवसांत शहराच्या विविध भागात राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.