वाहनचालक-क्लिनरकरिता आज विशेष मोहीम
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. मनपा कर्मचाऱयांसाठी महापालिका कार्यालयात लस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत 800 स्वच्छता कामगारांनी लस घेतली आहे. मंगळवारी स्वच्छता वाहनावरील वाहन चालक आणि क्लिनरना लस देण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आरोग्य खात्याच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. दुसऱया टप्प्यात महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, प्रारंभी लस घेण्यास स्वच्छता कामगारांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, स्वच्छता कामगारांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकराशेपैकी आतापर्यंत 800 कामगारांना लस देण्यात आली आहे. शहरातील विविध परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात येत होती. पण आता महापालिका कार्यालयातच लस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना सोयीचे झाले आहे. महापालिकेच्या कचरावाहू वाहनावरील चालक आणि क्लिनरना लस देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी सर्व वाहनचालक आणि क्लिनरना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांना देण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अकराशेपैकी 800 स्वच्छता कामगारांना लस देण्यात आली असून आणखी तीनशे कामगारांना लस देण्याचे शिल्लक आहे. महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना लस देण्यात आली आहे. येत्या चार दिवसात सर्व स्वच्छता कामगारांना लस दिल्यानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांना लस देण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.