प्रतिनिधी / बेळगाव
क्लब रोड येथील महापालिकेच्या जुन्या कार्यालयाशेजारी गाईचे वासरू पडले होते. सदर गाईचे वासरू आजारी असल्याची बाब निदर्शनास आल्याने मनपा अधिकाऱयांशी संपर्क साधण्यात आला. सदर वासरावर उपचार करून गो-शाळेत दाखल करण्यात आले. यामुळे सतर्क नागरिक व मनपा कर्मचाऱयांमुळे गाईच्या वासराचा जीव वाचविण्यात यश आले.
शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. तरीही ठिकठिकाणी मोकाट जनावरे फिरत आहेत. यापैकीच गाईचे वासरू क्लब रोडशेजारी रस्त्यावर विव्हळत पडले असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी वासराला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद मिळाला नसल्याने मनपाला कळविण्यात आले. त्यामुळे मनपा पशुसंगोपन विभागाच्या राजू संकण्णावर यांनी तातडीने धाव घेऊन वासराची पाहणी केली. औषधोपचार केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनामधून सदर वासराला गो-शाळेत दाखल करण्यात आले. मनपा अधिकाऱयांच्या प्रयत्नामुळे वासराचा जीव वाचला.