प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांत विविध समस्या भेडसावत असून रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्ती करावी, गरजूंना राखीव अनुदानामधून साहाय्यधन देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. पण याची दखल घेण्याकडे मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याची तयारी चालविली आहे.
महापालिका हद्दीतील समस्यांचे निवारण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो. शहरात सध्या पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे बारगळले आहे. मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अपघात घडत असल्याने माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी विनंती केली होती. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण याबाबत महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली नाही.
शुक्रवारी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा पवित्रा
महापालिकेकडून राबविण्यात येणाऱया योजना कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्यानंतर बंद करण्यात आल्या आहेत. योजना राबविण्यासाठी शासनाकडून तसेच मनपाकडून निधीची तरतूद करण्यात आली नाही. आश्रय योजना, घरकुल योजना तसेच आरोग्य चिकित्सा योजनांसाठी निधी मंजूर करण्यात आला नसल्याने गरजूंची गैरसोय होत आहे.
पण आरोग्य सुविधेसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले होते. तसेच घरपट्टी थकलेल्या नागरिकांसाठी वन टाईम सेटलमेन्ट योजना राबविण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही. त्या निषेधार्थ शुक्रवारी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.