बायोडिझेल तयार करण्याचा प्रस्ताव : खाद्यतेलाला प्रतिलिटर 10 रुपये देण्याचा विचार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध हॉटेल्स, चहा टपरी, कँटिनमध्ये वापरण्यात आलेले खाद्यतेल गटारीमध्ये अथवा अन्यत्र टाकले जाते. मात्र, हे तेल जमा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या मोबदल्यात प्रतिलिटर 10 रुपये देण्यात येणार आहेत. या टाकाऊ तेलापासून बायोडिझेल तयार करण्याचा विचार महापालिकेच्या आरोग्य विभागाने चालविला आहे.
सध्या तळलेल्या खाद्यपदार्थांची चलती मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे हॉटेल, चहा टपरी आणि कँटिनमध्ये तळलेल्या पदार्थांची विक्री करण्यात येते. मात्र, खराब झालेल्या खाद्य तेलातच चांगले तेल टाकून खाद्य पदार्थ बनविण्यात येतात. पण एकदा वापरण्यात आलेले तेल पुन्हा वापरल्यास शरीराला घातक ठरू शकते. हॉटेल, चहा टपरी, स्नॅक्स दुकाने व कँटिनमध्ये वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केला जात असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या नियमानुसार एकदा वापरलेल्या तेलामध्ये दुसऱयांदा खाद्यपदार्थ बनविणे धोकादायक आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसून जळालेल्या खाद्यतेलाचा वापर वारंवार करण्यात येतो.
अशा तेलामध्ये तयार करण्यात आलेले खाद्य पदार्थ खाल्यास घशाचे आजार, छातीचे आजार आणि पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जळालेल्या खाद्य तेलाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्यादृष्टीने हे तेल जमा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. काही हॉटेल, कँटिन आणि चहा टपरीमधील वापरण्यात आलेले खाद्य तेल गटार किंवा कचऱयामध्ये टाकण्यात येते. काही वेळा खाद्य पदार्थांमध्ये मिसळून जनावरांना घालण्यात येते. त्यामुळे गटारी तुंबण्याच्या समस्या निर्माण होतात. जनावरांनादेखील धोकादायक बनते. रस्त्याशेजारी व्यवसाय थाटणारे चहा टपरीवाले खराब झालेले किंवा जळालेले खाद्य तेल रस्त्याशेजारी टाकतात. त्यामुळे याचा धोका पादचाऱयांना असतो. या सर्व बाबींचा विचार करून जळालेले टाकाऊ खाद्यतेल जमा करण्यात येणार आहे.
जमा करण्यात आलेल्या खाद्य तेलाचा पुनर्वापर करण्याच्यादृष्टीने बायोडिझेल करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. नव्याने दाखल झालेले पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी हा प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी टाकाऊ खाद्यतेल जमा करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांना केली आहे. टाकाऊ खाद्य तेलावर प्रक्रिया करून वाहनांसाठी लागणारे इंधन तयार करता येऊ शकते. टाकाऊ खाद्य तेलाद्वारे बायोडिझेल बनविण्यात येते. शहरातील जळालेले टाकाऊ खाद्यतेल जमा करून बायोडिझेल तयार करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी सांगितली.
बागलकोट येथे प्रकल्प कार्यान्वित
यापूर्वी बागलकोट येथे हा प्रकल्प राबविला असून टाकाऊ तेलापासून बायोडिझेल तयार करण्यात येत आहे. बेळगाव शहरात अनेक तांत्रिक महाविद्यालये असून त्या ठिकाणी बायोडिझेल तयार करण्याचा लघु प्लँट आहे. त्या प्लँटचा वापर करून शहरात जमा होणाऱया टाकाऊ खाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेल तयार करणार असल्याचे कलादगी यांनी सांगितले. तेल जमा करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षकांना केली आहे. प्रतिलिटर 10 रुपये देण्याचा विचार आहे. जळालेले खाद्यतेल इतरत्र टाकण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकडे देण्यात यावे, असे आवाहनही केले आहे.