प्रशासकीय गैरप्रकारासह मतदारांनी बोगस मतदान केल्याचा आरोप
बेळगाव
बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपणा आणि गैरप्रकारांविरोधात वॉर्ड क्र. 31 मधील निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्र. 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडलेली नाही. मोठय़ा प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. सदर वॉर्डातील मतदारयादीमध्ये बाहेरील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील 1500 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे बेनकनहळ्ळी व आंबेवाडी येथील तुरळक लोकांनी महापालिका निवडणुकीसाठी बेकायदा मतदान केले आहे. तसेच वॉर्ड क्र. 32 मधील 900 मतदारांची नावे वॉर्ड 31 मध्ये समाविष्ट केली आहेत. या सर्व प्रकारात शेकडो मतदारांनी बोगस मतदान केले आहे, असा आरोप वॉर्ड क्रमांक 31 मधील पराभूत उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी केला आहे. तसेच याविरोधात दाद मागण्यासाठी बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
9 जणांना नोटीस
न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून यासंदर्भात नगरविकास खाते, कर्नाटक राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, निवडणूक निर्वाचन अधिकारी आणि वॉर्डातील निवडणूक रिंगणातील उर्वरित चार उमेदवार अशा एकूण नऊ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.