सामाजिक अंतर पाळण्यासाठी आटापिटा पण कार्यालयातील गर्दीकडे दुर्लक्ष : नियमावली पायदळी तुडविण्याचा प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढला असून राज्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन प्रत्येक चौकात व रस्त्यावर थांबून महापालिकेचे अधिकारी करीत आहेत. मात्र, महापालिका कार्यालयातच नियमावली पायदळी तुडविण्याचा प्रकार घडत असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयातील नागरिकांना कोण आवर घालणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिकेच्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने घरपट्टी चलन देण्याचे काम ठप्प झाले होते. पण ज्या मालमत्ताधारकांनी यापूर्वी पीआयडी क्रमांक घेऊन ऑनलाईन घरपट्टी जमा केली होती, त्यांनी यावर्षीची घरपट्टी
ऑनलाईनद्वारा भरली आहे. काही मालमत्ताधारकांनी बेळगाव-वन कार्यालयात जावून घरपट्टी भरणा केली आहे. पण ज्यांच्याकडे पीआयडी क्रमांक नाही, तसेच मागील काही वर्षांची घरपट्टी बाकी आहे, त्यांना महापालिका कार्यालयात जावून घरपट्टी चलन घ्यावे लागत आहे. त्यामुळे सदर मालमत्ताधारक गोवावेस येथील महापालिकेच्या महसूल कार्यालयात धाव घेत आहेत. सध्या कोरोनाचा प्रसार वाढला असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्मयता होती. शहरातील काही दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. एप्रिल महिन्यात घरपट्टीवर पाच टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे घरपट्टी भरण्याकरिता चलन घेण्यासाठी नागरिक गोवावेस मनपा कार्यालयात आणि बेळगाव-वन कार्यालयात गर्दी करीत आहेत. पण या ठिकाणी कोणतेच सामाजिक अंतर राखले जात नाही. नागरिक गर्दीतच चलन घेण्यासाठी आणि घरपट्टी जमा करीत आहेत. काही नागरिक मास्क वापरण्याकडेही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्यासह सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात महापालिकेच्यावतीने स्पीकरद्वारा आवाहन करीत ऊन-पावसात फिरत आहेत. पण महापालिका कार्यालयातच कोरोना नियमावलीची ऐशी की तैशी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी दुकानांसमोर किंवा भाजी मार्केटमध्ये मार्किंग करण्याची सूचना महापालिकेचे अधिकारी करीत आहेत. पण महापालिका कार्यालयात होत असलेल्या गर्दीकडे अधिकाऱयांचे व कर्मचाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. कार्यालयात मार्किंग करण्याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. बेळगाव-वन कार्यालयातही कोरोना नियमावलीची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणीही कोणतेच मार्किंग नसल्याने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे महापालिका कार्यालय आणि बेळगाव-वन कार्यालयात कोरोनाची लागण होत नाही का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. नागरिक जीव धोक्मयात घालून महापालिकेचा कर भरण्यासाठी येत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.