प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका वॉर्डस्तरीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदार यादी तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार याद्या छपाई करून सज्ज ठेवल्या आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे प्रलंबित ठेवण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर तात्कालिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार राज्य शासनाने वॉर्डस्तरीय आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याची सूचना महापालिकेला केली होती. सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या असंख्य मनपा कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली होती. तरीदेखील मतदार यादी तयार करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. मतदार यादी तयार करण्यासाठी अवधी देण्याची विनंती महापालिकेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार नव्या मतदार याद्या तयार केल्या आहेत.
छपाईचे काम पूर्ण करून दि. 25 मे पर्यंत तात्कालिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. पण सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्कालिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.