हजार चौ. फुटाहून अधिक विस्तीर्ण घराची माहिती देण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
सधन कुटुंबीयांनी देखील बीपीएल कार्ड बनवून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा अपात्र बीपीएल कार्डधारकांचा शोध घेऊन त्यांची कार्डे रद्द करण्यात येणार आहेत. शहरातील अपात्र बीपीएल कार्डधारकांचा व सधन कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी मनपाची मदत घेण्यात येणार आहे. 1 हजार चौरस फुटापेक्षा जास्त आकाराचे घर असलेल्या मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश मनपाच्या महसूल अधिकाऱयांना बजावण्यात आला आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना वाढीव रेशनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र अंत्योदय, बीपेएल तसेच एपीएल कार्ड घेण्यासाठी काही नियमावली शासनाने घातली आहे. पण काहींनी खोटी माहिती देऊन अंत्योदय व बीपीएल कार्डे मिळविली आहेत. काही कुटुंबे एकत्रित रहात असताना देखील विभक्त असल्याचे दाखवून बीपीएल कार्ड करून घेतले आहे. बीपीएल कार्डे बनविण्यात काही एजंट कार्यरत असून सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून अंत्योदय व बीपीएल कार्डे घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रेशन कार्डवर मिळणाऱया धान्याची विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गरजू व गरीब रेशनपासून वंचित रहात आहेत.
वास्तविक पाहता ट्रक्टर अथवा चारचाकी वाहन असणारे, कर भरणारे, 1 हजार चौरस फूटपेक्षा जास्त जागेत घर असणारे, 1 लाख 20 हजार रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱया तसेच सरकारी नोकरीत असणाऱयांकडे बीपीएल कार्ड असू नये. तरी देखील खोटी माहिती देऊन काहींनी बीपीएल कार्ड मिळविले आहे. त्यामुळे अशा सधन कुटुंबांची बीपीएल कार्डे रद्द करण्यात येणार आहेत. याकरिता महापालिकेच्या महसूल विभागाची मदत घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या महसूल अधिकाऱयांकरवी शहरातील बीपीएल कार्डधारकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
याबाबत मनपाच्या महसूल अधिकाऱयांना सूचना करण्यात आली असून 1 हजार चौरस फुटापेक्षा जास्त आकाराचे घर असलेल्यांची यादी आठ दिवसांत देण्याचा आदेश बजावला आहे. घरोघरी जावून कोरोनाबाधितांची माहिती घेणे, सिलडाऊन करणे तसेच कोरोनाबाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे अशा विविध जबाबदाऱया मनपा महसूल अधिकाऱयांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय कार्यालयात घरपट्टी जमा करून घेण्याचा आदेशही बजावण्यात आला आहे. अशातच आता एक हजारपेक्षा जास्त आकाराच्या घराची माहिती देण्याची सूचना करण्यात आल्याने महसूल अधिकारी अडचणीत आले आहेत. सध्या कोरोनाचा आलेख वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच विविध जबाबदाऱया सोपविण्यात येत असल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱयांमध्ये नाराजी पसरली आहे.