शुक्रवारी दिवसभर घेणार विकासकामांचा आढावा
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्याचे नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. राज्यातील विविध महापालिकांचा विकास आढावा घेणार आहेत. ते शुक्रवार दि. 8 रोजी बेळगाव दौऱयावर येत आहेत. यावेळी स्मार्टसिटी, महापालिका, पाणी पुरवठा मंडळ आणि बुडा अशा विविध विभागाच्या कारभाराची माहिती घेणार आहेत. यामुळे पावणेदोन वर्षापा महिन्यापासून बंद असलेल्या मनपा सभागृहात शुक्रवारी दिवसभर नगरविकास मंत्र्यांची बैठक चालणार आहे.
बेळगाव दौऱयावर येऊन विकासकामांचा आढावा घेणार होते. पण विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मागील बैठक बेंगळूर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने विकास आढावा बैठक घेण्यात येणार आहे. याबाबतची पूर्वसूचना महापालिका प्रशासनासह विविध विभागाच्या प्रमुखांना देण्यात आली आहे. यामुळे सर्व अधिकारी विकासकामांचे प्रगती पत्रक तयार करण्यात गुंतले आहेत.
शुक्रवारी दिवसभर नगरविकासमंत्री बैठका घेणार असून सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत स्मार्टसिटी, महापालिका, पाणी पुरवठा मंडळ आणि बुडाने राबविलेल्या विकासकामांची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत महापालिकेच्या कारभाराची माहिती नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. घेणार आहेत. दुपारी 12 वाजता बुडा कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा आणि दुपारी 12.45 वाजता शहर पाणी पुरवठा नियोजनाची माहिती घेण्यासाठी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत स्मार्टसिटी कामाचा आढावा घेणार आहेत.
शहरातील समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका सभागृहात चर्चा करून निर्णय घेण्यात येतात. पण सभागृह अस्तित्वात नसल्याने फेब्रुवारीपासून सभागृहात बैठका झाल्या नाहीत. मात्र नगरविकासमंत्री बसवराज बी. ए. यांच्या उपस्थितीत सभागृहात विविध विभागाच्या बैठका चालणार आहेत. बैठकीकरिता विकास आढावा तयार करण्यात महापालिकेतील सर्वच विभागप्रमुख गुंतले आहेत. सर्व विभागाच्या कामांची माहिती संगणकाद्वारे दाखविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे..