मुंबई \ ऑनलाईन टीम
अँटिलिया स्फोटक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त ३० दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली. अँटिलिया स्फोटक प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबई येथील घराबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक कार सापडली होती. त्यानंतर ज्यांच्या ताब्यात ही कार होती त्या मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. ५ मार्चला हिरेन यांचा थेट मृतदेहच आढळून आला. दरम्यान, NIA ने हिरेन यांच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी दिली होती, असा दावा केला आहे. त्याशिवाय, या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचं एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती असा दावा एनआयएच्या वकिलांनी जून महिन्यात केला होता.