मुंबई \ ऑनलाईन टीम
अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सुनील माने यांना अटक केली आहे. याप्रकरणात याआधी सचिन वाझेसोबतच रियाझ काझी नावाच्या अधिकाऱ्यास देखील एनआयएनं अटक केली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
अँटिलिया स्फोटकं प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सुनील माने यांचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे.
अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर काही दिवसांतच स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. सुरुवातीला आत्महत्येचं चित्र असलेला हा मृत्यू नंतर हत्या असल्याचं एनआयएच्या तपासामध्ये स्पष्ट झालं आहे.