सातारा : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे मनसेच्या माजी तालुकाप्रमुखाचा जुन्या भांडणातून निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैभव विकास ढाणे, (वय 28, रा. जळगाव, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम विकास ढाणे (वय 26, रा. जळगाव, ता. कोरेगाव) याने कोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास वैभव ढाणे याचे हातपाय तोडून खून केला असल्याची माहिती समोर आली. जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्या अनुषंगाने एका संशयिताचे नावही समोर आले असून, कोरेगाव पोलीस त्यानुसार तपासाची सुत्रे हालवत आहेत. दरम्यान, शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे जळगाव परिसरात ठाण मांडून बसले होते.