ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या कंबरेजवळील स्नायूची शस्त्रक्रिया होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
राज ठाकरे यांच्या कंबरेला त्रास होत आहे. त्यांच्या कंबरेचा स्नायू दुखत आहे. याच कारणामुळे त्यांना बसण्यास त्रास होत आहे. राज ठाकरे मागील 3 दिवसांपूर्वी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर एमआरआयची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कंबरेच्या स्नायुवर शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच राज यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल.