मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी तातडीनं अमित ठाकरेंना नाशिकला बोलावल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेंवर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांना नाशिकमध्ये बोलावण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे सध्या नाशकात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिरोडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर आता शिरोडकर यांच्याकडे असलेली जबाबदारी अमित ठाकरेंना मिळणार असल्याची चर्चा आहे. तसा आग्रह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंकडे धरला आहे. अमित ठाकरे पक्षाचा युवा चेहरा असल्यानं त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरेंना दिली जाऊ शकते.