2018 नंतर प्रथमच एकत्रित सहभाग, अंतिम फेरीत एकतर्फी विजय
बुडापेस्ट / वृत्तसंस्था
मनिका बात्रा व जी. साथियन या मिश्र दुहेरीतील स्टार जोडीने डब्ल्यूटीटी चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद संपादन करत जोरदार पुनरागमन केले. यापूर्वी 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत एकत्रित खेळलेल्या या जोडीने अंतिम फेरीत हंगेरीच्या 94 व्या मानांकित डोरा मॅदर्स्ज व इकेस्की यांचा 3-1 असा धुव्वा उडवत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. त्यांनी 11-9, 9-11, 12-10, 11-6 असा एकंदरीत विजय साजरा केला.
मनिका व साथियन यांनी सकारात्मक सुरुवात करत जेतेपदावर शिक्कामोर्तब करुनच मोहिमेची विजयी सांगता केली. 2024 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत एकत्रित खेळत राहण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनिकाने यापूर्वी अनुभवी शरथ कमलसमवेत आशियाई स्पर्धेत कांस्य जिंकले. शिवाय, टोकियो ऑलिम्पिकमध्ये ते एकत्रित खेळले होते. दरम्यान, जवळपास 2 वर्षांनंतर एकत्रित खेळत असताना साथियनने येथील स्पर्धेत जेतेपद मिळवणे अवघड होते, अशी प्रतिक्रिया दिली. फायनल अवघड होती. पण, त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील सातव्या मानांकित बार्बरा व पिस्तेज या जोडीचे आव्हान मोडीत काढणे आणखी कठीण, आणखी आव्हानात्मक होते, असे साथियनने नमूद केले.
एकत्रित अतिशय कमी सराव केलेला असतानाही जेतेपद संपादन करता आले, याचा विशेष आनंद असल्याचे साथियन म्हणाला. परस्परपूरक खेळ साकारण्यात यश आले, तेथे जेतेपद निश्चित झाल्याची प्रतिक्रियाही त्याने व्यक्त केली.
‘मनिकाने अलीकडेच एकत्रित खेळण्याचा प्रस्ताव दिला आणि पुन्हा एकत्रित खेळण्याची हीच योग्य वेळ आहे, यावर एकमत असल्याने आम्ही त्यावर शिक्कामोर्तब केले. मनिका ही भारताची आजवरची सर्वोत्तम महिला खेळाडू आहे आणि तिच्या अनुभवाचा नेहमी फायदा होत आला आहे. आम्ही जितके खेळत आलो आहोत, तितका आमचा खेळ बहरत राहिला आहे’, असे साथियनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
साथियन यानंतर या आठवडाअखेरीस झेक ओपनमध्ये खेळणार आहे तर मनिका बात्रा मायदेशी परतणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील आशियाई चॅम्पियनशिप ही सर्व खेळाडूंसाठी मोठी स्पर्धा असेल. एकेरीत मनिका 60 व्या स्थानी असून येथे ती यापूर्वी उपांत्य फेरीत पोहोचली होती. साथियनला यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमधील एकेरीत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर, मनिकासमवेत बुडापेस्टमध्ये मिळवलेले जेतेपद त्याच्यासाठी अर्थातच स्वागतार्ह ठरले आहे.