मल्टिस्टारकास्ट चित्रपट बनविणे ही बॉलीवूडची खासीयत. भरमसाठ कलाकारांचा एकत्रित भरणा असला की यशाची भट्टी चांगली जमते असे मानणारा वर्ग चित्रपट सृष्टीत आहे. काही प्रमाणात हे गणित यशस्वीही होते. त्यामुळेच याची मांडणी करण्यात मराठी सिनेसृष्टी देखील मागे नाही. नव्याने आलेला मराठी मल्टिस्टारकास्टचा ‘धुरळा’ हा चित्रपट देखील याचेच उदाहरण ठरणार आहे.
टी. व्ही. चॅनल्सवरून लोकप्रियता मिळवत आणि प्रेक्षकांना आपल्या हक्काचे लाडके अभिनेते म्हणून परिचीत झालेले अनेक चेहरे एकत्रित आणण्याची किमया ‘धुरळा’ चित्रपटाने केली आहे.
यामध्ये अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव, उमेश कामत हे नामवंत कलाकार आहेत. त्यांच्या सोबतीला सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांची साथ आहे. अलका कुबल यांची देखील मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांचा संच चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला उचलून धरतील, असे मानण्यास जागा आहे.
मराठी चित्रपट सृष्टीने आता वेगवेगळय़ा नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपट देण्याचा चंग बांधला आहे. त्यामधूनच दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांची चलती आहे. व्यावसायिक यशाचे गणित माफक असले तरी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन आणि धमाल यांची मात्र रेलचेल असते. आपल्या घरातील टी. व्ही. चॅनल्सवर अनेक कार्यक्रमांमधून या चित्रपटांचे प्रोमोज दिसू लागले आहेत. त्यामधून याविषयीची उत्सुकता वाढीस लागली आहे. त्यामुळे येणाऱया दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांना भावणार आहे.
‘धुरळा’ हा शब्द खरे म्हणजे त्रासदायक वाटणारा उपद्रवकारक ठरू शकणारा अशा अर्थाने घेतला जातो. मात्र मनोरंजनाच्या संदर्भात याचे परिणाम वेगळे आहे. मनोरंजनाचा मोठा झंझावात या अर्थाने ‘धुरळा’ हा चित्रपट झळकला आहे.
बेळगावातील प्रकाश चित्रपटगृहात शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे गणित कसे राहणार, हे येत्या काही दिवसात कळणार आहे.
उपेंद्र बाजीकर