आदमापुरात बाळुमामा समाधी दिनात भोंदूंचा निषेध
प्रतिनिधी / सरवडे
क्षेत्र आदमापूर येथे सदगुरू बाळुमामांच्या ५५ व्या समाधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांनी बाळुमामांच्या नावाचा वापर करून मोठा झालेल्या मनोहर भोसले याच्या विरोधात एकीने लढा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाविकांनी बाळूमामांच्या ताक-कण्या प्रसाद घेऊन मनोहर भोसलेसह सर्वच भोंदू बाबांचा धिक्कार व निषेध केला.
संत बाळुमामांच्या ४ सप्टेंबर या समाधी दिनानिमीत्त बाळुमामा फौंडेशनच्यावतीने ताक – कण्या महाप्रसाद वाटप प्रसंगी आयोजित सभेत हा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व बाळुमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, एम.डी. पाटील, अॅड.राजेंद्र देशमुख प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी सरपंच विजय गुरव यांनी मनोहर भोसले यांनी बाळुमामांच्या नावावर आपला आर्थिक लाभ करुन घेतला. तर बाळुमामांचा वंशज, अवतार, शिष्य अशी नावे लावत भक्तांची दिशाभुल करुन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले. भविष्यात असे भोंदु तयार होऊ नयेत याची जबाबदारी भक्तांनी घ्यावी असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रा.एस.पी.पाटील, मच्छिंद्र टिंगरे, दिनकरराव कांबळे,दयानंद कोणीकेरी,सतिश जाधव,धनाजी पाटील,आनंदा पाटील , नामदेव पाटील यांनी आपल्या भाषणात मनोहर भोसले यांना लक्ष्य केले. बाळु मामाचा भंडारा लावून जर कोणी भक्ताला लुबाडायचा प्रयत्न करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा भोंदू महाराजांना भक्तांनी थारा देऊ नये असे आवाहन केले. याप्रसंगी राजेंद्र देशमुख पनवेल, राजश्री कळमकर राधानगरी व शहाजी पाटील उंदरवाडी यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रा.एन.एच.पाटील यांनी केले.यावेळी सतिश जाधव,रुकडीकर मामा,एस.के.पाटील, गुंडोपंत पाटील,सुधिर पाटील,अमर पाटील, प्रकाश खापरे, काशिनाथ शिंणगारे, एल.जी.पाटील, पी.एल.पाटील, यशवंतराव कळमकर, ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थाचे प्रतिनिधी,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.