कोलकाता / वृत्तसंस्था
भवानीपूर पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भवानीपुरातून दोनवेळा विजय प्राप्त केला होता. मात्र, आताच्या निवडणुकीत त्यांनी 58,835 इतके मताधिक्य मिळविले आहे. या विजयामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही अबाधित राहिली आहे. दरम्यान, भवानीपूरबरोबरच अन्य दोन मतदारसंघांमध्येही तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्यामुळे सत्ताधाऱयांचे विधानसभेमधील संख्याबळ वाढले आहे.
भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांचे लक्ष रविवारी सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागले होते. अखेर या जागेवर ममता बॅनर्जी यांनी बाजी मारली. दक्षिण कोलकातामधील भवानीपूर जागेसाठी टीएमसी उमेदवार बॅनर्जी यांना 85,263 मते मिळाली. तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना 26,428 मते मिळाली. तर माकपचे श्रीजीव विस्वास यांना 4201 मते मिळाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांनी मतमोजणीअंती जाहीर केली. इतक्मया मोठय़ा मताधिक्मयाने मिळालेला हा विजय एक विक्रम आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. यापूर्वी मे महिन्यात नंदिग्राम मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्टय़ा निवडून येणे क्रमप्राप्त होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ज्यावेळी 12 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष सुरु केला. या मतमोजणीमध्ये एकूण 21 राऊंड होते. ममतांच्या या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजयोत्सवावेळी ममता बॅनर्जींचे घर आणि पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे, भाजप आणि माकपच्या राज्य कार्यालयांबाहेर सन्नाटा पसरलेला दिसत होता. दरम्यान, मतदानोत्तर हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी विजय उत्सव आणि प्रतिक्रियांवर बंदी घालण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती.
मीच मॅन ऑफ द मॅच- प्रियंका टिबरेवाल
पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात आपल्याला 25 हजारहून अधिक मते मिळाल्यामुळे आपणच मॅन ऑफ द मॅच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी भवानीपूरच्या जनतेची सदैव ऋणी !
विक्रमी विजयानंतर ममतादीदींनी भवानीपूरच्या जनतेचे आभार मानले. नंदिग्राममध्ये रचलेल्या षड्यंत्राला भवानीपूरमध्ये अद्दल घडवण्यात आली. भवानीपूरमध्ये जवळपास 46 टक्के लोक बंगाली नाहीत. त्यांनीदेखील मला मतदान केले. पश्चिम बंगालची निवडणूक सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी षड्यंत्र रचले होते. मात्र आता भवानीपूरच्या जनतेने मला मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहीन, असे ममता म्हणाल्या. तसेच सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणूक घेणाऱया निवडणूक आयोगाचेही त्यांनी आभार मानले.
तृणमूलचा दावा ठरला खरा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 50,000 पेक्षा जास्त मतांनी जिंकणार असल्याचा दावा तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. 30 सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत भवानीपूरच्या 2,06,389 मतदारांपैकी केवळ 57.09 टक्के मतदान झाले. तर 26 एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी निवडणूक लढवली तेव्हा हा आकडा 61.79 टक्के होता. चट्टोपाध्याय 28,719 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
बंगालमधील अन्य दोन जागाही टीएमसीकडेच!
भवानीपूरसोबतच मुर्शिदाबादच्या समसेरगंज आणि जंगीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. समसेरगंजमध्ये टीएमसीचे उमेदवार अमीरुल इस्लाम 22 फेऱयांच्या मतमोजणीनंतर 25,195 मतांनी आघाडीवर राहिले. त्यांना 91,826 मते प्राप्त झाली असून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे जैदूर रहमान यांना 66,631 मते मिळाली. जंगीपूरचे टीएमसीचे उमेदवार झाकीर हुसेन मतमोजणीच्या 21 फेऱयांनंतर 64,529 मतांच्या मोठय़ा फरकाने आघाडीवर राहिले. हुसैन यांना 1,00,560 मते मिळाली आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुजित दास यांना 36,031 मते मिळाली.
ओडिशातील पिपलीमधून बीजेडीचे रुद्रप्रताप महारथी विजयी
ओडिशामधील पिपली विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणीत बिजू जनता दलाचे (बीजेडी) उमेदवार रुद्रप्रताप महारथी सुरुवातीपासूनच मोठय़ा फरकाने आघाडीवर होते. 13 वी फेरी संपल्यानंतर महारथी यांना 42,774 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार पटनायक यांना 31,578 मते मिळाली. तसेच काँग्रेसचे उमेदवार बिश्वोकेशन हरिचंदन महापात्रा यांना केवळ 2,602 मते मिळाली. तेविसाव्या फेरीअंती महारथी यांचे मताधिक्य 20,838 पर्यंत वाढले होते. अंतिमतः ते 20,916 मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली.