भाजपची सर्वात मोठी मोहीम : दिग्गज नेते करणार पश्चिम बंगालमध्ये प्रचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱया पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारमोहिमेला गतिमान करत केंद्रीय मंत्री, एक उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांना विविध आघाडय़ांवर तैनात केले आहेत. या सर्व नेत्यांना प्रत्येकी 6 ते 7 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चालू आठवडय़ाच्या अखेरीस राज्याचा दौरा करणार आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी गजेंद्रसिंग शेखावत, संजीव बालियान, प्रल्हाद पटेल, अर्जुन मुंडा आणि मनसुखभाई मांडविया पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पोहोचणार आहेत.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनाही पश्चिम बंगालमध्ये जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर बंगालमध्ये पक्षाच्या निवडणूक तयारींची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.
19 डिसेंबर रोजी अमित शाह या सर्व नेत्यांसोबत एक बैठक करणार असून यात पुढील रणनीतिवर चर्चा होणार आहे. चालू आठवडय़ात शाह हे एका प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. तसेच मिदनापूर जिल्हय़ात एका शेतकऱयाच्या घरी दुपारचे भोजन गृहमंत्री करतील.
लोकसभेतील यश उत्साहवर्धक
भाजप नेतृत्वाने यापूर्वीच केंद्रीय पदाधिकाऱयांना पश्चिम बंगालच्या 5 विविध भागांची जबाबदारी सोपविलेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला आतापर्यंत विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागांवर विजय मिळाल्याने भाजपचा उत्साह दुणावलेला आहे. तृणमूल काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून भाजपने जागा पटकाविली आहे.
तृणमूलच्या बंडखोरांवर लक्ष
तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकलेले शुभेंदु अधिकारी हे शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. अधिकारी यांनी राज्य मंत्रिमंडळ तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पूर्व वर्धमानचे तृणमूल आमदार सुनील मंडल यांच्या घरी अधिकारी पोहोचले होते. त्यांनी तेथे पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांशी चर्चा केली आहे. राज्यातील सुमारे 70 विधानसभा मतदारसंघावर शुभेंदु यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. बंगालच्या दौऱयादरम्यान शाह हे पूर्व मेदिनीपूर समवेत तीन जिल्हय़ांमध्ये सभा घेणार आहेत. पूर्व मेदिनीपूर हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. तेथून शुभेंदु यांचे वडिल आणि बंधू अनुक्रमे लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.