श्रीकृष्णाच्या गुण, लावण्य व ऐश्वर्याची कीर्ति मित्रविंदेने परस्पर ऐकली होती. तिने मनाचा निर्धार केला होता की माझा नवरा कृष्णच असेल. तिने आपल्या आईला आपल्या मनातील गुज सांगितले की मी कृष्णाशीच लग्न करेन. तिच्या आईने तिच्या मनातील हे गुज आपल्या दोन्ही मुलांना सांगितले. ते ऐकून विंद अनुविंद म्हणाले-मित्रविंदे! तुझे जर कृष्णाबरोबर लग्न लावून दिले तर ती आम्हाला लाजिरवाणी गोष्ट होईल. कृष्ण हा सिंहासनाधिष्टीत राजा नाही. तो केवळ गुरे राखणारा गुराखी आहे. त्यापेक्षा तू चैद्य नरेश शिशुपाळ, मगध नरेश जरासंध किंवा कौरवांचा राजा दुर्योधन यापैकी कुणाशीही विवाह केलास तरी तो आम्हाला मान्य होईल. कृष्ण हा तुझ्यासाठी योग्य वर नाही. तुझ्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे अनेक राजे येथे आले आहेत. ते अत्यंत धनवान, गुणवान, रूपसंपन्न व पराक्रमी आहेत. त्यांना पाहून, त्यांच्यापैकी कोणताही राजा तू आपला पती म्हणून निवड. कृष्णाचा विचार मात्र डोक्मयातून काढून टाक.
तिच्या भावांच्या शब्दांनी मित्रविंदा घायाळ मात्र झाली. एखादा मातीचा घडा दगडाच्या तीव्र आघाताने फुटतो तसे तिच्या हृदय छिन्न विच्छिन्न झाले. तिचे अंग थरथर कापू लागले. डोळय़ांतून अश्रूच्या धारा लागल्या.
कृष्णावेगळा स्वयंवरिं । अन्य भूपाळ सहसा न वरिं। ऐसा निश्चय दृढ अंतरिं । करूनि श्रीहरी चिंतितसे । मित्रविंदेचें अंतर । सर्वज्ञ सर्वग कमलाकर। जाणोनि पातला पैं सत्वर । तोही प्रकार अवधारा ।
कृष्णाशिवाय स्वयंवरात मी अन्य कुणालाही वरणार नाही असा मनाचा दृढ निश्चय करून ती मनातून कृष्णाचे चिंतन करू लागली. मित्रविंदेच्या मनात काय चालले आहे हे त्या सर्वज्ञ, सर्वव्यापक कमलाकराने जाणले व त्याने काय केले ते
पहा.
भक्तवत्सल जो श्रीपति । जाणोनि मित्रविंदेची आर्ति । कृपेनें द्रवोनि विवरी चित्तीं । कुरुवर नृपति तें ऐकें । वसुदेवाची कनि÷ भगिनी । राजाधिदेवी चातुर्यखाणी । जयत्सेनाची वरि÷ पत्नी । कृष्णें जाणोनि पितृष्वसा । पितृष्वसेचें कन्यारत्न । सप्रेमभावें मदेकशरण। विंदानुविंदीं करूनि विघ्न । मजलागून उपेक्षिलें । रुक्मिणीचिये विवाहकाळीं। रुक्मि जैसा विरोधशाळी। तैसीच मित्रविंदा वेल्हाळी । विंदानुविंदीं निषेधिली । तरी मी जाऊनि अकस्मात। जिंकूनि भूभुज विवाहीं प्राप्त । मित्रविंदेचें पुरवीन आर्त । हा सिद्धांत दृढ केला । मग आज्ञापि दारुकाप्रति । तेणें तुरंग जुंपिले रथीं । गरुडध्वज सहसा रथीं । पावला श्रीपति अवंतिके ।तंव मंडपीं नृपांच्या श्रेणी। बैसल्या असती ऐश्वर्यखाणी । नोवरी आणिली श्रृंगारूनी । पाहती नयनीं नृपरत्ने ।सखिया कथिती नृपांच्या नामा । वीर्यशौर्यादि प्रतापगरिमा। परंतु मित्रविंदेचा प्रेमा । मेघश्यामा अनुसरला । ऐसिये समयीं अकस्मात । मृगेंद्र जैसा कुंजरांत । उडी घालूनि आमिष नेत । तेंवि हरि हरित नोवरिये । बलात्कारें धांवोनि हरि । नोवरी उचलूनि दोहीं करिं । वाहता जाला निजरहंवरिं । नृपें घाबिरिं खळबळिलीं ।
देवदत्त परुळेकर