मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विशेष सन्मान : आमदार झांटय़े यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत पुढे नेणार
डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातील महत्त्वाचु पंचायत असलेल्या मये वायंगिणी या पंचायतीच्या सरपंचपदी पंचसदस्य तथा माजी सरपंच तुळशीदास चोडणकर यांची बिनविरोध निवड झाली. सामंजस्य करारानुसार माजी सरपंचा उर्वी मसूरकर यांनी राजिनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी मये पंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी विशेष बैठक घेण्यात आली होती.
माजी सरपंच उर्वी मसूरकर यांनी सरपंचपदाची धुरा सांभाळताना भरीव कार्य केल्यानंतर अंतर्गत सामंजस्य करारानुसार आपल्या पदाचा स्वेच्छा राजिनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. व या पदावर यावेळी पंचसदस्य तुळशीदास चोडणकर यांचीच वर्णी लागणार हे ठरलेलेच होते. त्यानुसार त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या निवड प्रक्रियेला उपसरपंच विश्वास चोडणकर, पंचसदस्य विजय पोळे, कृष्णा परब, उर्वी मसूरकर, सीमा आरोंदेकर, संतोष गडेकर, विनीता गावकर, प्रेमेंद्र शेट, कुंदा मांदेकर, नमिता तारी यांची उपस्थिती होती. तर निवडणूक अधिकारी म्हणून नवनाथ आमें, सचिव महादेव नाईक. पंचसदस्य तुळशीदास चोडणकर यांचे नाव सरपंचपदासाठी पंचसदस्य उर्वी मसूरकर यांनी सुचविले तर विश्वास चोडणकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. आणखीन कोणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्याने चोडणकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
आमदार प्रवीण झांटय़े यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कार्य करणार.
मये गावचा माजी सरपंच या नात्याने आपल्याला पंचायतीच्या कामाचा चांगला अनुभव आहज. मात्र यावेळी राज्यात भाजपचेच सरकार आहे. तसेच मयेचे आमदार प्रवीण झांटय़े हेही भाजपचेच आमदार असल्याने यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पंचायतीचे काम पुढे नेणार. मये पंचायत क्षेत्रातील अनेक सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना पुर्णस्वरूप देताना पंचायत क्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये कोणत्याही राजकीय भेदभावाविना विकासाला प्राधान्य दिले जआणार असून येणाऱया जिल्हा पंचायत निवडणुकीत मये मतदारसंघात भाजपच्याच उमेदवाराला भरघोस मतांची आघाडी देण्यासाठी आपण वावरणार, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास चोडणकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री व आमदाराची भेट.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर तुळशीदास चोडणकर यांनी व सहकारी पंचसदस्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची व मयेचे आमदार प्रवीण झांटय़े यांची भेट घेतली. यावेळी उपसरपंच विश्वास चोडणकर, पंचसदस्य कृष्णा परब, उर्वी मसूरकर, सीमा आरोंदेकर, नमिता तारी, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, नरेंद्र तारी आदींची उपस्थिती होती. आमदार प्रवीण झांटय़े यांनी तुळशीदास चोडणकर यांचे अभिनंदन करताना चोडणकर यांना पंचायत कार्याचा मोठा अनुभव असून त्याचा लाभ त्यांना होणार आहे. विकासाच्या बाबतीत मये पंचायतीला आपला सर्वस्वी पाठिंबा असल्याचे यावेळी आमदार झांटय़े यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून तुळशीदास चोडणकर यांचा विशेष सन्मान.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास चोडणकर आमदार प्रवीण झांटय़े व इतर पंचसदस्यांसह गेले असता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यांंनी तुळशीदास चोडणकर यांची स्तुती करताना आपण आमदारही होण्यापूर्वी तुळशीदास चोडणकर यांनी पंचसदस्य, सरपंच म्हणून भरीव कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची एक वेगळी शैली असून सरपंच असताना त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांना या पंचायतीच्या सरपंचपदी निवड करून योग्य निर्णय घेतला आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विशेष भेटवस्तू देऊन चोडणकर यांचा सन्मान केला.