मरकजमध्ये सामील, पण माहिती ठेवली लपवून!
प्रतिनिधी/ बेळगाव
नवी दिल्ली येथील तबलिगी जमातच्या मरकज या धर्मसभेत सहभागी होऊन आपापल्या गावी परतलेल्यांमुळे कोरोनाचा धोका वाढल्याचा आरोप होत असतानाच मरकज कनेक्शनची माहिती लपवून ठेवलेल्या एका युवकामुळे संपूर्ण समाजाला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी शनिवारी सात जणांवर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या चौघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हिरेबागेवाडी परिसरात वैद्यकीय तपासणी वाढविण्यात आली आहे. आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या घरोघरी भेटी देऊन माहिती जमवित आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला सहकार्य करण्याऐवजी काही महाभाग माहिती लपवून ठेवून ‘आम्ही प्रशासनाला कसे मूर्ख बनविले?’ याचा आनंद मानत आहेत. अशा महाभागांमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
पोलीस आयुक्तांनी शनिवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून मरकज कनेक्शनची माहिती लपवून ठेवणारा तरुण व याकामी त्याला सहकार्य करणारे सहा जण अशा एकूण सात जणांविरुद्ध भादंवि 143, 202, 270, 308, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
माहिती लपवून ठेवणाऱया महाभागाला सिव्हिल हॉस्पिटलमधील क्वारंटाईन विभागात दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबातील चौघा जणांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून कोविड-19 टास्कफोर्सच्या नोडल अधिकाऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
13 ते 18 मार्च 2020 पर्यंत झालेल्या धर्मसभेत भाग घेतलेल्या हिरेबागेवाडी येथील एका 20 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. 3 एप्रिल रोजी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालात रुग्ण क्रमांक 128 असा त्याचा उल्लेख होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे आई-वडील व भावालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या तरुणाबरोबर धर्मसभेत भाग घेतलेल्या त्याच्या मित्राला आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मरकजहून परतलेल्या या महाभागाने टास्कफोर्सच्या कर्मचाऱयांनी घरोघरी भेट देऊन ज्यावेळी माहिती जमविली, त्यावेळी आपण फेब्रुवारीतच मरकजहून परतल्याची चुकीची माहिती दिली आहे. केवळ हा महाभागच नव्हे तर तबलिग जमातचे सचिव, गावातील प्रमुख व त्याच्या कुटुंबीयांनीही चुकीची माहिती दिली. कोरोनाचा धोका माहिती असूनही हा तरुण उघड माथ्याने फिरत होता. ही गोष्ट उघडकीस येताच पोलिसांनी तो तरुण व त्याला सहकार्य करणारे सहा जण अशा एकूण सात जणांवर एफआयआर दाखल केला आहे.
माहिती लपवून ठेवू नका जे नवी दिल्ली येथील मरकजमधून परतले आहेत, त्यांनी स्वतःहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांना सहकार्य करावे. माहिती लपवून ठेवल्यास स्वतःला व स्वतःच्या कुटुंबीयांनाच कोरोनाचा धोका निर्माण होणार आहे. ही गोष्ट टाळण्यासाठी माहिती लपवून ठेवण्याऐवजी उघडपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी केले आहे. संशयितांसंबंधी ज्यांना माहिती असेल त्यांनीही प्रशासनाला माहिती द्यावी. नहून माहिती लपवून ठेवणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल