प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये शनिवारी प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत समारंभ पार पडला. भरती झालेल्या 51 प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. लवकरच देशाच्या विविध भागात देशसेवेसाठी ते रुजू होणार आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडिअर जयदीप मुखर्जी यांनी जवानांना मार्गदर्शन करत मानवंदना स्वीकारली. प्रशिक्षणार्थी तेजस बी. एस. व मेजर सूरज बेल्लीप्पा यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले.
युवा सैनिकांनी राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटल कलर्सच्या उपस्थितीत मातृभूमीच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करू, अशी शपथ घेतली. आत्मविश्वासाने सैनिकांनी घेतलेल्या शपथेमुळे हा कार्यक्रम प्रभावी ठरला. आपल्या मुलांना देशसेवेसाठी रुजू होताना पाहून पालकांचेही डोळे पाणावले.
सैनिकांना मार्गदर्शन करताना मराठा लाईट इन्फंट्रीच्या वैभवशाली इतिहासाची ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी आठवण करून दिली. सैनिकांच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व याविषयी त्यांनी माहिती दिली. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण घेतलेले जवान जीवनात कुठेही कमी पडत नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.