ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनतर्फे निदर्शने
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा जातीचे ओबीसीकरण नको यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी सेवा फौंडेशनच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
दुपारी बाराच्या सुमारास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. यानंतर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार अनंत गुरव यांना सादर करण्यात आले.
निवेदनातील मागण्या अशा, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात मराठा जातीचा शिरकाव होऊ नये, सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार मराठा जातीचे ओबीसीकरण करु नये. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसींचा शासकिय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती त्वरीत करण्यात यावी. ओबीसींना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी. आदिवासी जिह्यातील ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे. एाबीसींच्या महाज्योती संस्थेसाठी 1000 कोटींची तरतुद करावी. आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधीची तरतुद करावी. राज्यात शंभर बिंदु नामावली लागू करावी. शासकिय सेवेतील ओबीसी कर्मचार्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे.
ओबीसी शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना 60 वर्षे वयानंतर पेन्शन योजना लागू करावी, ओबीसी बहजुन कल्याण विभागाची कार्यालये प्रत्येक जिह्यात सुरु करावीत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर, दिगंबर लोहार, किसन काटकर, संजय सुतार, गणपतराब बागडी, रणजीत गुरव आदी सहभागी झाले होते.