विधानभवनाकडे जाताना घेतले ताब्यात : पोलीस-आंदोलकांत झटापट
घोषणांनी परिसर दुमदुमला : आमदार नीतेश राणेंची भेट
प्रतिनिधी / मुंबई
मराठा आरक्षण वगळून राज्यसरकारने जाहीर केलेली नोकर भरती स्थगित करावी, या मागणीसाठी कोल्हापूरातून गनिमीकाव्याने मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनल्स (सीएसटी) समोर सोमवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. येथून विधानभवनावर धडक मारायला निघालेल्या आंदोलक व पोलीसांमध्ये झटापट होऊन धुमश्चक्री उडाली. या ठिकाणी पोलीसांनी दोनशेहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सुटका केली. मराठा आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील, सचिन तोडकर, सकल मराठा कोल्हापूरचे समन्वयक प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातून रविवारी मध्यरात्री दोनशेहून अधिक मराठा आंदोलक गनिमीकाव्याने मुंबईत पोहोचण्यात यशस्वी झाले. दुपारी चारच्या सुमारास हे आंदोलक `सीएसटी’ येथे एकत्र जमले. या ठिकाणी `सरकारने नोकर भरतीला स्थगिती द्यावी’ यासह `एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं’ अशा घोषणा ठिय्या मारला. या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. येथे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला. काही वेळातच या ठिकाणी पोलीस दाखल झाले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीसांचीही तारांबळ उडाली. यानंतर आंदोलकांनी विधानभवनावर धडक मारण्यासाठी कूच केली. काही अंतर चालून गेल्यावर पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घालताना झटापट होऊन धुमश्चक्री उडाली.
यावेळी आंदोलकांनी `एक मराठा लाख मराठा’ अशा पुन्हा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर आंदोलकांन सोडून देण्यात आले. आंदोलनात महादेव आयरेकर, उमेश साळोखे, शैलेश जाधव, गौरव लांडगे, संतोष तांबेकर, मोहन पाटील, भास्कर पाटील, धनश्री तोडकर, समीक्षा मोहिते, नीता कराळे, सुनयना साळोखे आदी सहभागी झाले होते.
‘ओबीसी’ संघटनेचा पाठींबा
मुंबईत आंदोलनासाठी गनिमीकाव्याने दाखल झालेल्या मराठा बांधवांपाठोपाठ ना कोल्हापूरच्या `ओबीसी’ संघटनेच्या पदाधिकारीही या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पाठींबा दिला. यामध्ये उमेश पोर्लेकर, महेश लोखंडे, सुनील जाधव, आदित्य कोळेकर आदींचा समावेश होता.
मोहिम फत्ते….
कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आंदोलन करणारच असा निर्धार कोल्हापूरच्या मराठा आंदोलकांनी निर्धार व्केला होता. त्यानुसार जोरदार तयारीही केली. विविध पातळ्यांवर त्याचे नियोजन करण्यात आले. यावर पोलीसांची कडक नजर ही होती. परंतु त्यांना चकवा देत गनिमीकाव्याने मुंबईत दाखल होऊन कोल्हापूर स्टाईलने आंदोलन करण्यात यशस्वी झालो. आमची मोहिम फत्ते झाली, अशा प्रतिक्रीया आंदोलनाचे प्रमुख दिलीप पाटील, प्रसाद जाधव, सचिन तोडकर यांनी व्यक्त केल्या.