प्रतिनिधी/ सातारा
येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जुगार खेळताना आढळून आलेल्या अकरा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 90 हजार 700 रुपये रोख रक्कम, 8 मोबाईल, 1 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाने जुगार अड्डा सुरू असणाऱया हॉटेल मराठा पॅलेस येथे छापा टाकला.
त्या ठिकाणी किरण विठ्ठल नलावडे (रा. इंदिरानगर, विलासपूर, सातारा) संजय दत्तात्रय लेवे. स्वप्निल चंद्रकांत काकडे (दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, सातारा. हेमंत शिवाजी चव्हाण (रा. व्यंकटपुरा), ओमकार रामचंद्र शिंदे (रा. मंगळवार तळे), उमर निशाण मोमीन (रा. गुरुवार परज), समीर कदम (यादोगोपाळ पेठ), इम्तियाज अब्दुल सय्यद (रा. गुरुवार पेठ), अमोल जगन्नाथ चौगुले (रा. मंगळवार पेठ), धनंजय हिरालाल शिंदे (रा. मोरया कॉलनी, पिरवाडी, खेड), हिरालाल शंकर शिंदे (रा. आसगाव, ता. सातारा) हे अकरा जण तेथे जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत त्यांच्याकडून 2 लाख 90 हजार 700 रुपये रोख रक्कम, 8 मोबाईल, एक दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.